गावाची भौगोलिक माहिती
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यामधील कागल पासून पश्चिमेला सुमारे सहा किलोमीटर अंतरावर वसलेले “व्हन्नूर” हे छोटेसे गाव आहे. गावची लोकसंख्या सुमारे ४३०४ आहे. गावात साधारणपणे स्त्री आणि पुरुष यांचे प्रमाण सारखेच आहे. व्हन्नूर हे गाव १६ ५८ ६७ २५ अंक्षाशावर तर ७४ २६ ५० १२ रेखांशावर वसलेले आहे. भारतीय प्रमाण वेळेपेक्षा सूर्योदय ३२ मिनीटे उशिरा उगवतो.सर्वांची मातृभाषा मराठी आहे. या गावात मराठा, धनगर, जैन, हरिजन, लिंगायत, मातंग व चर्मकार समाजाचे लोक अतिशय गुण्यागोविंदाने राहतात.
मौजे व्हन्नूर गावातील भैरवनाथ देवालय (तीर्थक्षेत्र)पर्यटन स्थळ ‘क‘ वर्ग यात्रा स्थळ व्हन्नूर गावचे आराध्य दैवत आणि ग्रामदैवत श्री भैरवनाथ ही अतिशय जागृत आणि नवसाला पावणारे अशी ख्याती असणारे देवस्थान आहे. गावातील लोक दसरा व गुढीपाडवा हे सण मोठ्या भक्ती भावाने एकत्र येऊन साजरे करतात. या गावातील प्रमुख पिके ऊस, भात, ज्वारी, भुईमूग व गहू इत्यादी आहेत.तसेच शेतीवर आधारित पशुपालन व्यवसाय सुद्धा केला जातो.
या गावांमध्ये असे सांगितले जाते की हे गाव भोज राजाच्या उपराजधानीचे गाव म्हणून या गावाची ख्याती होती. होन आणि ऊर या दोन शब्दांच्या मिश्रणातून “व्हन्नूर” या शब्दाची निर्मिती झाली आहे. होन म्हणजे सोने आणि ऊर म्हणजे गाव अर्थात सोन्याचा गाव म्हणून व्हन्नूर हे भोज राजाच्या उपराजधानीचे गाव होते याबाबत गावांमध्ये काही अतिशय जुन्या खुणा सापडल्या आहेत.
गाव म्हटल की नाळ जोडलेली दिसते ती मातीशी,गाव म्हटल की तिथे आपुलकी, प्रेम, दया, माणुसकी, एकता ह्या सगळ्यांचा जन्म हा गावापासून होतो,गाव म्हणजे जणू स्वर्गच भासतो कारण तिथे काय कमी आहे सगळ पुरून वूरलेले दिसते अगदी खाद्य पदार्थापासून ते आरोग्य पर्यंत सगळ्या गोष्टी ह्या जीवनाला पूरक असतात . शुद्ध हवा,नैसर्गिक वातावरण हे अगदी मनाला प्रसन्न करून टाकत ,असे सुंदर माझे व्हन्नूरगाव !